श्री विठ्ठल - रुक्मिणी भक्तनिवास येथे ध्वजारोहण संपन्न, ◼️ अन्नछत्रात गोड पदार्थाचा समावेश, ◼️ श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेस अलंकार परिधान,

श्री विठ्ठल - रुक्मिणी भक्तनिवास येथे ध्वजारोहण संपन्न,  ◼️ अन्नछत्रात गोड पदार्थाचा समावेश,   ◼️ श्री विठ्ठल -रुक्मिणी मातेस अलंकार परिधान,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज):- श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने श्री विठ्ठल -रुक्मिणी भक्तनिवास येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, राजेंद्र सुभेदार, बलभिम पावले, विनोद पाटील, भिमाशंकर सारवाडकर, राजेश पिटले, पांडूरंग बुरांडे, अतुल बक्षी, सावता हजारे, राजेंद्र घागरे, शंकर मदने तसेच मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंदिर परिसर व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास संपूर्णपणे तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. तसेच फुलांची नयनरम्य आरास करण्यात आल्याने परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय, मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये भाविकांसाठी भोजनप्रसादात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. याचा सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला. दर्शनरांगेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी चहापान तसेच खिचडी वाटपाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री विठ्ठलास सोने मुकुट, बालाजी नाम, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचा कंगन जोड, मोत्याचा तुरा, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, तुळशीची माळ, मोहरांची माळ, अष्टपैलू मण्याची कंठी, पदकासह लॉकेट, तांदळ्या हार, सूर्यकळ्याचा हार, झनक हार आदी तसेच श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.