खळबळजनक बातमी!.... विठ्ठल मंदिराच्या दर्शन मंडपाजवळ सापडल्या दारुच्या बाटल्या ◼️ दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शन मंडपातील परिसरामध्ये दारूच्या बाटल्या, गुटखा-माव्याच्या पुड्या आढळून आले आहेत.
भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी या प्रकाराचा समोर आणला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंदिर समितीच्या स्वच्छतेचे काम एका खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. तरीही मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीच्या वस्तू वारंवार आढळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशी चुकीचं कृत्यं करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिरसाट यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ज्या दर्शन मंडपातून भाविक विठोबाच्या - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जातात त्याच दर्शन मंडपाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाठ यांनी केली आहे. तर मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांनी याप्रकरणी संबंधित कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा व्यवस्थापकांनी दिला आहे.
या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाविकांमध्ये संताप आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिरातील हा सारा प्रकार भाविकांच्या श्रद्धेचा अपमान करणारा आणि अत्यंत गंभीर्याने घेण्यासारखा प्रकार असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे. मंदिर प्रशासन, पोलिस आणि स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या संबंधित कंपनीने तातडीने चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी सर्व सामान्य भाविकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता याप्रकरणामध्ये नेमकी कोणावर आणि काय कारवाई होते आणि त्यासाठी किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे सारं प्रकरण समोर आणणारे विक्रम शिरसाट हे पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि आरोग्य समितीचे माजी सभापती राहिले आहेत. याशिवाय त्यांनी पंढरपूरचे भाजपा शहराध्यक्षही आहेत. ते पंढरपूरच्या विकास आणि स्वच्छता मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवतात. शहरातील धूळ समस्या, नामसंकीर्तन सभागृहाचे नामकरण, गॅस तुटवडा, मंदिर परिसरातील स्वच्छता अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाकडे निवेदने दिली आणि आंदोलने केली आहेत.