*रीलस्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतरही आरोपी मोकाटच,मंगळवेढा पाेलीसांची प्रतिमा हाेतीय मलीन,शिवशरण कुटूंबियाने अज्ञातस्थळी आत्मदहन करण्याचा गृहमंत्र्यांना दिला लेखी निवेदनाव्दारे इशारा*

*रीलस्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतरही आरोपी मोकाटच,मंगळवेढा पाेलीसांची प्रतिमा हाेतीय मलीन,शिवशरण कुटूंबियाने अज्ञातस्थळी आत्मदहन करण्याचा गृहमंत्र्यांना दिला लेखी निवेदनाव्दारे इशारा*

---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा ( दै.पंढरी नगरी न्यूज) :

 ब्रम्हपुरीची रील स्टार रोहिणी पाराध्ये (वय 25 वर्षे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाचा गुन्हा दाखल होवून तब्बल दीड महिना उलटूनही मंगळवेढा पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने रोहिणीचे वडिल बाळासो गिरजाप्पा शिवशरण यांनी मंगळवेढा पोलीसांच्या निषेधार्थ अज्ञात स्थळी कुटूंबिय आत्मदहन करण्याचा इशारा देवून याची सर्वस्वी जबाबदारी  पोलीस खात्यावर राहिल असा लेखी निवेदनाव्दारे इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.

या घटनेची हकीकत अशी की, यातील रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) हिने पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून दि.26/05/2026 रोजी हॉटेल ग्रामपंचायत मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तब्बल 23 दिवसांनी पोलीसांनी 18 जून 2026 रोजी भाग क्रमांक 5 प्रमाणे गु.र.नं.531/2026 बी.एन.एस. कलम 108,115(2),352,351(2) प्रमाणे मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल होवून तब्बल पावणे दोन महिने होत आले तरीही मंगळवेढा पोलीसांची आरोपीला अटक करण्याची मानसिकता दिसून येत नसल्याने पोलीसांचा मनमानी कारभार उघड झाला असून सर्वसामान्य जनतेमधून या पोलीसांचा कर्तव्यावर संतापजनक प्रतिक्रीया उमटत आहेत. एका तरुणीचा लाख मोलाचा जीव जावूनही पोलीस आरोपीला अटक करत नसतील तर मंगळवेढा पोलीस ठाण्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा संतापजनक सवाल सुज्ञ नागरिकामधून विचारला जात आहे. आरोपीला अटक करु नये यासाठी पोलीस दलातील एका नातलगाचा व राजकीय व्यक्तीचा दबाब असल्याबाबत संशय शिवशरण कुटूंबियाने व्यक्त केला आहे. शिवशरण यांनी मंगळवेढा पोलीस आरोपीस अटक करणार नसतील तर गृहमंत्र्यांनी राज्यगुप्तचर विभागाकडे हा तपास देवून दूधाचे दूध व पाण्याचे पाणी करुन रोहिणी हिला न्याय मिळवून दयावा अशाही नागरिकामधून व शिवशरण कुटुंबाकडून प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. दरम्यान आरोपीस अटक न केल्यास शिवशरण कुटूंबिय अज्ञातस्थळी मंगळवेढा पोलीसांच्या निषेधार्थ व अन्याय विरुध्द आत्मदहन करणार असल्याचे दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करुन या निवेदनाच्या प्रती राज्याचे पोलीस महासंचालक,राज्य महिला आयोग, राज्य गुप्तचर विभाग,पुणे पोलीस प्राधिकरण विभाग,पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, पोलीस अधिक्षक सोलापूर आदींना ईमेलव्दारे पाठविण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना बोलताना बाळासाहेब शिवशरण यांनी सांगितले.