पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ):- महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महसूल विभागातील ८२ अधिकाऱ्यांना तदर्थ पदोन्नती दिली आहे. यामध्ये पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांची ही उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे या पदोन्नतीमुळे राज्यातील ५७ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी (गट-अ), तर २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार (गट-अ) पदावर बढती मिळाली आहे.
सन २०२५-२६ च्या निवडसूचीनुसार एस-१९ वेतनश्रेणीतील ५७ तहसीलदारांना एस-२० वेतनश्रेणीतील उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. या दरम्यान, पदोन्नती मिळालेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांची सविस्तर पदस्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील काम पूर्ण झाल्यानंतर महसूल विभाग वाटप नियम, २०२१ नुसार स्वतंत्र आदेशाद्वारे त्यांची पदस्थापना केली जाणार आहे.
उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना पुढील पदोन्नतीपूर्वी संबंधित महसुली विभागात किमान तीन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार आहे. तहसीलदार सचिन लंगुटे यांना उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, मित्र ,नातेवाईक तसेच विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन करून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.