अखेर शिक्षण क्षेत्रातला बोका कारवाईच्या फासात अडकला..?

अखेर शिक्षण क्षेत्रातला बोका कारवाईच्या फासात अडकला..?

-------------------------------------------------------------------------------------
सोलापूर, पंढरी-नगरी न्यूज : गुरुजी ग्लोबल असो की लोकल, प्रत्येकाला ज्या खुर्चीतून ते बोलत होते त्याच खुर्चीत २५ हजारांची लाच घेताना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार पकडले गेले आणि शिक्षकांच्या दबलेल्या भावनांना सोशल मीडियात मोकळी वाट मिळाली.

मिम्स‌मध्ये शिक्षकांनी मन:शांती शोधल्याची चर्चा होती. डॉ. लोहार यांना नुकताच पुरस्कार मिळाल्याने सुरू असलेल्या अभिनंदनाच्या पोस्टची जागा अचानकपणे वेगळ्या पोस्टने घेतली. डॉ. लोहार यांच्याबद्दल वाईट झाले, असे कोणीही म्हणताना दिसत नसल्याने त्यांनी सोलापुरात काय कमावलं, हा प्रश्‍न या निमित्ताने पुढे आला आहे. सोलापूरचे शिक्षणाधिकारी म्हणून डॉ. लोहार यांचा १३ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. या कालावधीत शिक्षण विभागात सरस्वतीची जागा 'माया'ने कधी घेतली, हे अनेकांना समजलेच नाही.

◼️ 'शिक्षण'चे दहा जण रजेवर

भूकंप किंवा त्सुनामी येऊन गेल्यावर त्या भागात होणारी दुर्दशा आणि आज जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाची दशा सारखीच होती. या कार्यालयातील तब्बल दहा कर्मचारी आणि अधिकारी आज रजेवर होते. शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांच्या दालनाला बाहेरून कडी लावण्यात आली होती. नेहमी गजबजलेल्या शिक्षण विभागात आज स्मशानशांतता होती. डॉ. लोहार यांच्या पुढे-पुढे फायली घेऊन जाणारे त्यांच्या मर्जीतील काही खास कर्मचारी आज कुठेही दिसत नव्हते.

◼️ पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मालमत्ता.

लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेले प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांच्या कोल्हापुरातील घरात सोने खरेदीच्या पावत्या कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडल्या आहेत. पुणे, मुंबईतील फ्लॅट; कोल्हापूर, सोलापुरात जागा, जमिनी असल्यासंबंधीची माहिती सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोळा केली आहे. लोहार यांनी माया जमविल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडला गेला.