सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..,
---------------------------------------------------------------------------------
स्व .वसंतराव दादा काळे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर तालुक्यात पंधरवडा विविध ठिकाणी कार्यक्रमाचे भरगच्च नियोजन ---------------------------------------------------------------------------------
भाळवणी( दै. पंढरी नगरी न्यूज) : सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त व २१व्या पुण्यतिथी निमित्त २९ जानेवारी ते ०९ फेब्रुवारी २०२३ पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे यांनी दिली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराने रविवार दि.२९जानेवारी रोजी पटकुरोली येथे करण्यात येणार असून,सहकार शिरोमणी कारखाना व वसंतदादा काळे मेडिकल फौंडेशन संचलित मल्टीस्पेशालिटी चॅरीटेबल जनकल्याण हॉस्पीटल पंढरपूर यांचे संयुक्त् विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबीर १ फेब्रुवारी तुंगत येथील ग्रामपंचायत संस्कृतिक भवन, ३ फेब्रुवारी कासेगांव येथील आनंद गवळी हॉस्पीटल ५ फेब्रुवारी रोजी भाळवणी येथील वसंतराव काळे विद्यामंदिर येथे घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये नामांकिततज्ञ डॉक्टरांकडून डोळ्याचे सर्व प्रकारचे आजार, मोतीबिंदु, भिंगरीपण, डोळ्यातुन पाणी येणे, लाल होणे, लहान मुलांचे आजार, दमा, सर्दी खोकला, ताप, पोटाचे आजार, लहान मुलांची काविळ, सर्व प्रकारचे पोटाचे विकार, थंडी ताप, रक्तातील पेशी-कमी जास्त् होणे, मधुमेह, रक्त्दाब तसेच स्त्रियांचे सर्व प्रकारचे विकार, मासिक पाळीतील त्रास, अनेक वर्ष मुले न होणे गर्भाशय पिशवीतील दोष इ.आजारावर मोफत तपासणी व निदान करण्यात येणार असून, मोती बिुदूचे ऑपरेशन येण्या-जाण्याच्या सोयीसह मोफत करण्यात येणार आहे. सदर शिबीरामध्ये ई.सी.जी. साखर तपासणी (ब्लडशुगर) मोफत करण्यात येणार असून, सर्व प्रकारच्या महागड्या रक्त तपासण्या संजीवनी पॅथकाईड सर्व्हीसेस, पंढरपूर यांचेवतीने अत्यल्प फी मध्ये सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. तसेच 0९फेब्रुवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.०२ ते ०८ फेब्रुवारी या कालावधीत कारखाना कार्यस्थळावर सकाळी ८ ते ११ गाथा पारायण व सायं. ८ ते १० किर्तन सोहळा साजरा करण्यात येणार असून, या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिध्द विविध महाराजांचे किर्तन होणार असून, गुरुवार दि.०९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. झी टॉकिज फेम भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवणे, परतूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सदर कालावधीत श्रवण करण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच ०९ फेब्रुवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर वसंत केसरी निकाली कुस्थ्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आलेले असून, दु.१.०० ते ३.०० वाजेपर्यत कुस्त्या नेमण्यात येणार असून, दु.३.०० वा. कुस्त्यी आखाड्याचे उदघाटन होवुन कुस्त्यांस सुरुवात होणार आहे. या कुस्ती आखाड्यामध्ये विजयी मल्लांना वसंत केसरी चषक देवुन, सन्मानित करण्यात येणार आहे. या आखाड्यात १० लाखापर्यत बक्षिसे ठेवण्यात आली असून, या आखाड्यात गंगावेस तालीम कोल्हापूर येथील वस्ताद विश्वास हरगुले यांचा पट्टा पै.प्रकाश बनकर विरुध्द् हनुमंत आखाडा पुणे येथील गणेश दांगत यांचा पट्टा पै.माऊली कोकाटे यांच्यामध्ये व शिवनेरी तालीम अकलुज येथील नामदेव वाघमारे यांचा पट्टा पै.संतोष जगताप यांच्या विरुध्द् भोसले व्यायाम शाळा सांगली येथील शहाजी पवार यांचा पट्टा पै.प्रशांत शिंदे आणि गंगावेस तालीम कोल्हापूर येथील पै.सतपाल नागटिळक यांच्या विरुध्द् अमृत भोसले यांचा पट्टा पै.श्रीमंत भोसले अशा तीन इनामी कुस्त्या रंगणार आहेत. विजेता पैलवानास इनाम बक्षिस देण्यात येणार आहेत. या आखाड्यामध्ये मार्गदर्शन मल्लसम्राट पै.रावसाहेब मगर, समालोचक धनाजी मदने, पुळूजवाडी हे करणार आहेत.
तसेच कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेमध्ये दि.७ फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा, ८ फेब्रुवारी रोजी निराधार महिलांना साडी वाटप व ९ फेब्रुवारी रोजी सदभावना रॅली काढण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे सर्व कार्यक्रमाची जय्यत् तयारी करण्यात आली असून, सर्व गरजुंनी सर्वरोग निदान शिबीरास, सर्व भाविक भक्तांनी किर्तन सोहळ्यास व कुस्ती प्रेमींनी जंगी कुस्ती मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन कल्याणराव काळे यांनी केले.