मंगळवेढ्यातील समविचारी गट भाजपत जाणार की? प्रशांत परिचारकांनाच राष्ट्रवादीत आणणार?
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा.
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपर अर्बन बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. परिचारकांच्या सत्काराला रांग लागली असतानाच मंगळवेढा येथील समविचारी गटही पंढरपुरात पोचला. समविचारी गट व परिचारक यांच्यातील वाढता सलोखा लक्षात घेता हा गट भाजपत विलीन होणार की परिचारकांना राष्ट्रवादीत आणणार, याची चर्चा मंगळवेढ्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली.
पंढरपूरमधील सहकारी संस्थांवर परिचारकांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक गट खंबीरपणे पाठीशी राहिल्यामुळे समाधान आवताडे यांचा विधानसभेचा मार्ग सुकर झाला होता. पोटनिवडणुकीनंतरच्या काळात मात्र परिचारक समर्थकाने सवतासुभा घेतला. त्याची प्रचिती मंगळवेढ्यातील अनेक कार्यक्रमांतून आली.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक गटाने शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी गटाची मोट बांधून दामाजी कारखान्यावर ताबा मिळवला. पंढरपुरातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली दामाजी कारखान्याचा कारभार सुरळीत चालू असल्याने समविचारी गटाबद्दलची विश्वासार्हता वाढली असतानाच इतर निवडणुकांतही हाच टेंपो पुढे कायम राहिला आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील १८ पैकी ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा करणारे डिजिटल फलकही मंगळवेढ्यात लावण्यात आले होते, त्यामुळे एकंदरीत तालुक्याच्या राजकारणामध्ये समविचारी गटाचा प्रभाव वाढू लागला. भविष्यात पक्षीय चिन्हावर होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता एक तर ह्या समविचारी गटातील नेत्यांना कोणत्यातरी पक्षाचा झेंडा घ्यावा लागेल, त्यामुळे हे भाजपत जाणार की राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार याकडे लक्ष असणार आहे. समविचारी गटाने सुरू केलेली बांधणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम राहिली, तर तालुक्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरू शकते.
माजी आमदार प्रशांत परिचारकांच्या सत्कारासाठी मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, अजित जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी. बी. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, काँग्रेसचे सुरेश कोळेकर, नगरसेवक प्रवीण खवतोडे, रामकृष्ण नागणे, युन्नुस शेख, भारत बेदरे, बबलू ,सुतार रावसाहेब फटे, रामेश्वर मासाळ, संचालक बसवराज पाटील, औदुंबर वाडदेकर तानाजी कांबळे दिगंबर भाकरे,गोपाळ भगरे राजेंद्र पाटील,तानाजी काकडे, ज्ञानेश्वर भगरे महादेव लुगडे आदींनी पंढरपुरात हजेरी लावली होती.