कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या परिवर्तन नियतकालिकाचे प्रकाशन

कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या परिवर्तन नियतकालिकाचे प्रकाशन

---------------------------------------------------------------------------------

बार्शी( दै. पंढरी नगरी न्युज) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीच्या परिवर्तन नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच संस्थेचे उपाध्यक्ष मा. नंदनजी जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ एस एस गोरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तालुका कृषी अधिकारी श्री. एस एस कोयले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सृजनरंग २०२३-२४ व्यावसायिक महाविद्यालय नियतकालिक स्पर्धेसाठी या महाविद्यालयाचे "परिवर्तन" नियतकालिक तयार करण्यात आले आहे. सन २०२३-२४ सृजनरंग स्पर्धेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने या नियतकालिकात विविध विषयांवरील लेख, कविता, रेखाटन, अहवाल, उपक्रम, आदी विभागात प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला आहे. संपूर्ण वर्षभरात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा आदी प्रत्येक क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असल्या तरीही शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांवर विद्यार्थांचे विशेष लक्ष असते. याचाही परामर्श यात घेण्यात आला आहे. 

यावेळी मा. नंदनजी जगदाळे यांनी सदरचे नियतकालिक आकर्षक व गुणवत्तापूर्ण केल्याबद्दल संपादक मंडळ व सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कृतिशील उपक्रमावर भर दिल्यास शिक्षणप्रक्रिया आनंददायी होते. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी नियतकालिकात समाविष्ट उदयोन्मुख लेखक व कवींचे कौतुक केले. सदर अंकातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे प्रकटीकरण पहावयास मिळते. नियतकालीक हे विद्यार्थ्यांच्या नव निर्मितीचे व्यासपीठ आहे असे त्यांनी सांगितले.

हा अंक तयार करण्यासाठी संपादक म्हणून डॉ पी ए पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.