कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ एस. एस. गोरे हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. एस.एम.लांडगे, डॉ ए. जी. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमपूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अझरुद्दीन मुलाणी यांनी केले.अनुश्री महिंदरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची ओळख करून दिली. यावेळी नीरज कुमठके, नवनाथ गडदे, कोमल जंत्रे आणि संदेश भोजकर यांनी क्रीडा ,खेळ व मेजर ध्यानचंद याविषयी मनोगते व्यक्त केली. प्रा. के बी चव्हाण यांनी मेजर ध्यानचंद यांचा सविस्तर जीवन परिचय करून दिला.

यावेळी प्राचार्य डॉ एस.एस.गोरे यांनी भारताची क्रीडा परंपरा जोपासण्यासाठी तसेच मेजर ध्यानचंद यांच्या समर्पणाचा सन्मान करण्यासाठी क्रीडा दिन साजरा केला जातो असे सांगितले. ते म्हणाले, ध्यानचंद यांनी हॉकी या खेळात अतुलनीय कामगिरी केली म्हणून भारत सरकारने १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. क्रीडा दिन साजरा केल्याने जनमानसात खेळाबाबत जागृती निर्माण होते. ध्यानचंद यांच्या कार्याचा परिचय सर्वांना होतो. खेळातून एकतेची भावना निर्माण होते. आपण सर्वजण शारीरिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक पाहणे आवश्यक आहे. समाजाच्या अपेक्षांची पूर्ती करणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक व मानसिक समतोल राखला जावा यासाठी आपल्या कॉलेजचा फिटनेस ग्रुप तयार करून सातत्याने उपक्रम राबविण्यात यावेत. समाज माध्यमातून खेळाबाबत जागृती करावी. आपल्या परिसरात विविध क्रीडा संघटना व क्लब आहेत, यांच्याद्वारे निरोगी आरोग्याचा जागर करा. खेळ व व्यायाम याची शास्त्रीय माहिती समाजामध्ये द्यावी, समाजात एकतेची भावना निर्माण होण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर ,रॅली आयोजन, रक्तदान, देहदान ,अवयव दान, यासारखे उपक्रम राबवावेत, निसर्गाने आपणास बहाल केलेले निरोगी व्यक्तिमत्व ही खूप मोठी देणगी आहे याचा विचार करून समाजामध्ये व्यसनापासून दूर राहण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती,रूढी ,परंपरा यांचे उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक समाजाचे दिशादर्शक असतात म्हणून आपण सामाजिक भान राखायला हवे. आपण सर्वांनी समाज परिवर्तनासाठी योग्य ती पावले उचलणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मेजर ध्यानचंद यांनी देशाला गौरव मिळवून देण्यासाठी कौशल्याची पराकाष्टा करून पराग कोटीची समर्पण भावना राष्ट्रासाठी अर्पण केली. आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी, देश हितासाठी प्रामाणिकपणे हाती घेतलेले काम पार पाडूया ! हा संकल्प करून तो सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा. असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून कॉलेजमध्ये क्रीडा व खेळ याविषयी पोस्टर प्रदर्शन व क्रीडा साहित्य प्रदर्शन करण्यात आले.यात बी. पी.एड खेळाडूंनी नाविन्यपूर्ण पोस्टर तयार केली व सादरीकरण केले. यात सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उपस्थितांचे आभार मधुरा देशमुखे यांनी तर श्वेता मोरे व तेजस्वी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.