बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी...
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) : "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनप्रेम व आदर्श विचारांचा वारसा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे फार गरजेचे आहे,"असे विचार जयकुमार(बापू)शितोळे यांनी व्यक्त केले. येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा एकता मंडळाचे माजी अध्यक्ष काकासाहेब मुकटे, संचालक बाळासाहेब पवार, ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांतजी ठोकळ हे उपस्थित होते. प्रथमत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. पुढे बोलताना शितोळे म्हणाले,"अगदी प्रतिकूल परिस्थिती मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चशिक्षण घेत आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला.त्यांनी देशाला भारतीय राज्यघटना ही मौलिक भेट दिली.
त्याचबरोबर समाजशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र, महिला हक्क, कामगारांचे हक्क, कायदा, शेती धोरण, भाषा, बौद्ध धर्म आणि सामाजिक क्रांती या प्रत्येक क्षेत्रामध्ये अमर्याद योगदान दिले. सोशियल माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे सध्याच्या तरुण पिढीचा कल हा वाचनाकडे थोडासा कमी झालेला आहे तरी त्या तरुणांची पाऊले ग्रंथालयाकडे वळविण्यासाठी, वाचनाचे महत्व पटवून देण्याचे काम समाजातील तुम्हा आम्हा जेष्ठांचे आहे.त्याचबरोबर परिवर्तनवादी समृद्ध साहित्य उपलब्ध करून देणेचे कार्य हे ग्रंथालयाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकते यामुळे पुढे अगदी सशक्त आणि अभ्यासू पिढी निर्माण होऊ शकेल असेही विचार त्यांनी व्यक्त केले." प्रमुख मान्यवरांनी आपले यथोचित मनोगत व्यक्त करीत जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास सुतार,सतीश पाचकुडवे,योगेश जाधव,राहुल लोंढे,नितीन गव्हाणे,समिक्ष हुकेरे आदी उपस्थित होते.यावेळी प्रतिमेच्या शेजारी भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेबांचे चरित्र ग्रंथ माहितीसाठी ठेवण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले तर आभार मराठा एकता मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांत ठोकळ यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी सभासद व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.