बारामती ॲग्रो लिमिटेडतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विठ्ठल मंदिर समितीस रुग्णवाहिका भेट ,

बारामती ॲग्रो लिमिटेडतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विठ्ठल मंदिर समितीस रुग्णवाहिका भेट ,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) आमदार रोहित पवार, बारामती ॲग्रो लिमिटेड, बारामती यांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीस भेट स्वरूपात प्रदान करण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजता श्री विठ्ठल -रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार, पांडुरंग बुरांडे, दशरथ देवकुळे, सावता हजारे, राजेंद्र घागरे, संदीप कुलकर्णी तसेच विठाई हॉस्पिटलचे योगेश रणदिवे व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

बारामती ॲग्रो लिमिटेड यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून ही रुग्णवाहिका मंदिर समितीस भेट दिली आहे. पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना तात्काळ व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

सदर रुग्णवाहिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना त्वरित वैद्यकीय मदत पुरविणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः यात्रा कालावधी व गर्दीच्या दिवसांमध्ये आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ही रुग्णवाहिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बारामती ॲग्रो लिमिटेडचे मंदिर समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. भाविकांच्या सेवेसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, भविष्यातही भाविकांना सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्यासाठी मंदिर समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.