बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात भूगोल दिन साजरा..
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै. पंढरी नगरी न्यूज ) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, रासेयो,सांस्कृतिक विभाग, आकाश कुल यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल दिन व मकर संक्रांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. रामेश्वर कोठावळे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस .एस गोरे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वाती सुरवसे व जावेद पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ व्ही पी शिखरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, निसर्गाचा परिचय करून घ्या. निसर्गाशी समतोल साधा. बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी भूगोल दिन व मकर संक्रांत याविषयी सविस्तर माहिती दिली. आधुनिक काळात मानवी जीवन गतिमान झाले आहे. यामुळे पर्यावरण समतोल ढासळला जात आहे. भौतिक जीवन जगण्याची अतिरेकी भावना वाढत आहे. कौटुंबिक संवाद वाढविण्यासाठी सण व उत्सव यांची महत्वाची भूमिका आहे. पर्यावरण समतोल राखून वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा आनंद घ्यावा असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता सरफाळे यांनी केले. ऋषिकेश कोल्हे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थितांचे आभार शितल काकडे यांनी मानले. राजकन्या प्रक्षाळे व विशाखा सांगुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सांस्कृतिक प्रमुख डॉ एस डी भिलेगावकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ व्ही पी शिखरे, कार्यक्रम समन्वयक डॉ आर ए फुरडे, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.