विठ्ठल रुक्मिणी मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व चैत्री यात्रा काळात शहरात मांस, मटण विक्रीस मनाई..!

विठ्ठल रुक्मिणी मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व चैत्री यात्रा काळात शहरात मांस, मटण विक्रीस मनाई..!

------------------------------------------------------------------------------------
             मंदिर व्यवस्थापन समितीचा एक मुखी निर्णय
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर,( दै पंढरी नगरी न्यूज) चैत्र  शुध्द एकादशी ०२ एप्रिल २०२३ ला असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारी कालावधीमध्ये मंदीर परिसरात नारळ विक्री  करण्यास व नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई आहे. तसेच चैत्र वारी कालावधीमध्ये पंढरपूर  शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी जारी केले आहेत.

नारळाची साल मंदीर परिसरात टाकल्याने तसेच नारळ फोडल्याने चिखल होण्याची शक्यता असल्याने घसरंती होऊन कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी फौजदारी संहितेच्या कलम १४४ अन्वये दिनांक ०१ ते ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत मंदीर व मंदीर परिसरात नारळ फोडण्यास व विक्री करण्यास मनाई आहे. तसेच शहरातील कायदा व सार्वजनीक सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये  दिनांक ०१ ते ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत शहरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी गुरव यांनी पारित केले आहेत.