विठ्ठल मंदिर घेऊ लागलं मोकळा श्वास, मंदिराचं रुपडं पालटलं

विठ्ठल मंदिर घेऊ लागलं मोकळा श्वास, मंदिराचं रुपडं पालटलं

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज) : विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे वेगाने सुरु असून विठ्ठल मंदिराला पुरातन 500 वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे.सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसविण्यात येत आहे.

मंदिरातील नंतरच्या काळात बसविण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फारशा काढून टाकण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. विठ्ठल गाभाऱ्यात बसवलेल्या या ग्रेनाईटमुळे दगडांचे श्वसन थांबलं होतं.

यामुळे गाभाऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात दमटपणा राहत असल्याने याचा त्रास भाविकांना तर होताच होता, शिवाय देवाच्या मूर्तीवर देखील याचा विपरीत परिणाम जाणवत होता. पुरातत्व विभागाने तातडीने या फारशा हटविण्याच्या सूचना दिल्या आणि आता या 73 कोटीच्या आराखड्यात हे काम पहिल्या टप्प्यात वेगाने सुरु आहे.