श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील व्यंकटेश बालाजी मंदिर जिर्ण व कळस ढासळ्याने त्यास ठिकाणी नव्याने निर्मिती, श्री. विठ्ठल - रूक्मिणी मंदिर व्यतिरिक्त परिवार देवतांच्या मंदिराचे देखील पुरातत्व विभागा मार्फत संवर्धनाचे काम सुरू; कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री. विठ्ठल- रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्फत शासन निधीतून सुरू आहे. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांपैकी विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, बाजीराव पडसाळी व विठ्ठल सभामंडप येथील काम पूर्णत्वास आले आहे. तसेच श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदिरातील 26 परिवार देवता व शहरातील 28 परिवार देवतांच्या मंदिरांचे देखील जतन व संवर्धनाचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदिरातील महालक्ष्मी मंदिर व व्यंकटेश मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे.
श्री. विठ्ठल- रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरांचे संवर्धन व जिर्णोद्वार आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पुरातत्व विभागामार्फत ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये मे. सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची ई निविदा मंजुर करण्यात आली आहे. या कामास शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून, त्याचा उद्घाटन समारंभ कार्तिकी एकादशी 2023 रोजी करून प्रत्यक्ष कामास दि.16/12/2023 पासून सुरवात करण्यात आली आहे.
सदर जतन व संवर्धनाची कामे करीत असताना, त्यामध्ये अनेक परिवार देवतांची मंदिरे व मंदिराचा कळस हा ढासळलेला होता. त्याची जतन व संवर्धनाची कामे तातडीने करणे आवश्यक होते. त्यामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी मंदिर व व्यंकटेश मंदिर व इतरही परिवार देवतांच्या मंदिरांचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम सुरू करताना, त्याची विधिवत पुजा करून त्यानंतरच मुर्ती काढून जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. अशाच पध्दतीने व्यंकटेश बालाजी मंदिरातील मुर्ती देखील विधिवत पुजा करून मुर्ती नित्योपचार विभागात जतन करून ठेवली आहे. या मंदिराची पाहणी पुरातत्व विभाग व मंदिर समितीने संयुक्तरित्या केली होती आणि त्या ठिकाणी मंदिर खुप जिर्ण झाले होते व त्याचा कळस ढासळलेला होता. त्यामुळे सदरचे मंदिर सध्या जिर्णोद्वारासाठी हाती घेतलेले आहे. त्याची मुर्ती जतन करून ठेवलेली आहे. सदरचे व्यंकटेश बालाजीचे मंदिर इतर ठिकाणी स्थलांतरीत न करता, त्याच ठिकाणी पूढील 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्णपणे नव्याने निर्मित होईल व मुर्तीची विधिवत पूजा करून त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. या मंदिरातील दगड व इतर अनुषंगीक साहित्यास नंबरींग करण्यात आले असून, त्यामधील चांगल्या दर्जाचे दगड पून्हा त्याच ठिकाणी बसविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तरी भाविकांना मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे, श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील व्यंकटेश बालाजीचे मंदिर इतर ठिकाणी स्थलांतरीत न करता, त्याच ठिकाणी पूढील 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्णपणे नव्याने मंदिर निर्मित होईल. त्यामुळे भाविकांना पुढील काही दिवस व्यंकटेश बालाजीचे व इतर परिवार देवतांचे दर्शन घेण्यास विलंब लागू शकतो. तसेच सदरची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत पुरातत्व विभाग व ठेकेदारास सुचना देण्यात आलेल्या आहेत. भाविकांना व्यंकटेश बालाजीचे व इतर परिवार देवतांचे दर्शन लवकरात लवकर मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
श्री. विठ्ठल - रूक्मिणी मंदिराच्या व परिवार देवता मंदिराच्या जतन व संवर्धन आराखड्यातील कामास गती देऊन सदरची सर्व कामे वेळेत चांगल्या गुणवत्तेची करावीत याचा वेळोवेळी मंदिर समिती आढावा घेत आहे. त्याची पुरातत्व विभाग, ठेकेदार व वास्तुविशारद यांच्या समवेत आढावा बैठक देखील रविवार दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.