पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरी भाविकांनी गजबजली!
-------------------------------------------------------------------------------------
दै.पंढरी- नगरी न्यूज : दिवाळीची सुट्टी आणि शनिवार-रविवार या वीपेंडची संधी साधत श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी मुखदर्शनासह पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी २ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते.
सध्या कार्तिकी यात्रेच्यानिमित्ताने 'श्रीं' चे २४ तास दर्शन सुरू असल्याने भाविकांना वेळेत दर्शन मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनानंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली आहे. दिवाळीसाठी एकत्र आलेले कुटुंबीय श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता येत आहेत. राज्याच्या कानाकोपऱयातून तसेच परराज्यातून भाविक मोठय़ा संख्येने पंढरीत येत असल्याने शहरातील वाहनतळे फुल्ल झाली आहेत. भाविकांमुळे मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग, स्टेशन रोड भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांगेत उभे राहून पदस्पर्श दर्शन घेण्यावर भाविकांनी भर दिल्याने दर्शनरांग सारडा भवनपर्यंत गेली होती. कार्तिकी यात्रेपूर्वीच लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत आल्याने कार्तिकी यात्राच भरल्याचे चित्र दिसत होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
शहरात वाहतूकोंडी
मंदिरापासून मोठी वाहनतळे लांब असल्याने बहुतांश वाहनधारकांनी मंदिराजवळील गजानन महाराज मठ, भक्तनिवास आदी ठिकाणी वाहने आणण्यास पसंती दिली. वीपेंडला हजारोंच्या संख्येने भाविक आल्याने भाविकांच्या वाहनांनी शहरातील वाहनतळ फुल्ल झाले. त्यामुळे जागेअभावी वाहने रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती. यामुळे शहरात वाहतूककोंडी झाली होती.
प्रासादिक साहित्याची दुकाने फुलली
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला जाताना त्याचबरोबर दर्शन झाल्यानंतर भाविक पेढे, बुक्का, प्रासादिक साहित्य खरेदी करण्यास पसंती देत होते. यामुळे कोरोनात आर्थिक नुकसान सहन केलेल्या व्यापारी, दुकानदार यांना बहुतांश दिलासा मिळू लागला आहे. प्रासादिक साहित्य विक्रीतून मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येते.