दोन लाख परत केल्याप्रकरणी मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांचा प्रामाणिकपणाबद्दल जकराया शुगर तर्फे सत्कार.

दोन लाख परत केल्याप्रकरणी मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांचा प्रामाणिकपणाबद्दल जकराया शुगर तर्फे सत्कार.


--------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) :-

 मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांनी खात्यावर अज्ञात व्यक्तीचे आलेले दोन लाख तात्काळ प्रामाणिकपणे सदर बँकेला परत केल्याने जकराया शुगर फॅक्टरीचे चेअरमन सचिन जाधव यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व विठ्ठलाची मुर्ती देवून सत्कार करुन धन्यावद मानले आहेत.

या घटनेची हकीकत अशी,मंगळवेढ्याचे पत्रकार शिवाजी पुजारी यांचे येथील जकराया मल्टीस्टेट को-ऑप.बँकेत खाते असून या खात्यावर मागील चार दिवसापुर्वी अचानक दोन लाख जमा झाले होते. याबाबत शहनिशा करण्यासाठी पुजारी सदरच्या बँकेत गेले. त्यावेळी चौकशीत ही दोन लाखाची रक्कम जकराया शुगर फॅक्टरीमधील ऊसतोडणी मुकादमाची रक्कम पुजारी यांच्या खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले. पत्रकार पुजारी यांनी तात्काळ ती रक्कम सदर ऊसतोडणी मुकादम शिवाजी पाटील यांना परत पाठवून पत्रकारितेतील विश्वास अधिक दृढ केला. याची दखल घेवून कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव, उद्योगपती नाना चेळेकर,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिक गुंगे, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष अभिजीत लोखंडे, वित्त अधिकारी अजित शिंदे, अ‍ॅड.संतोष माने,सिध्दनाथ ज्वेलर्सचे चालक रावसाहेब चव्हाण,बँक व्यवस्थापक अविनाश रोकडे,लिपीक दत्तात्रय जाधव,ज्योती राऊत, सोनाली शिंदे,शिवाजी सातपुते आदींनी पत्रकार पुजारी यांचा सत्कार करुन धन्यवाद दिले.
बँक खात्यावर नजरचुकीने आलेले दोन लाख सदर व्यक्तींना परत केल्यानंतर पत्रकार शिवाजी पुजारी यांचा सत्कार करताना जकरायाचे चेअरमन तथा जि.प.सदस्य सचिन जाधव यांच्यासह   दिसत आहेत.