भीमा सहकारी साखर कारखाना; कारखाना निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक ठरले सिकंदर...

भीमा सहकारी साखर कारखाना; कारखाना निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक ठरले सिकंदर...

___________________________________________________

मोहोळ (दै पंढरी नगरी न्यूज): सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आज झाली. यात पाटील – परिचारक गटाचा सुपडा साफ झाला असून खासदार धनंजय महाडीक यांच्या विजयाची हॅट्ट्रिक झालीय.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर या तीन तालुक्याची आर्थिक नाडी असणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व म्हणजे १५ जागावर मतदारांनी विद्यमान चेअरमन आणि भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत प्रचंड मतांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिले आहे.

दरम्यान या निकालामुळे मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा यातील तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे सभासदाबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या आणि त्या संबंधित छोटे–मोठे उद्योगाच्या अर्थकारणाची निगडित असते. कारखान्यात येणारा ऊस आणि त्याचं योग्य वजन आणि मिळणारा समाधानकारक दर याची खात्री देणारा आणि आगामी पाच वर्ष कारखाना नीट चालू शकेल अशा व्यक्तीच्या हातात सत्ता देणे आवश्यक असते, असा विचार मतदाराच्या मनात असतो आणि गेल्या वर्षभरात खासदार मुन्ना महाडिक यांनी या दृष्टीने टाकलेली पावले ही त्यांना विजयाकडे घेऊन गेल्याचे दिसून येत आहे.

राज्यात शेतकरी संघटना दरासाठी आक्रमक आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी उसाचा दर निवडणुकीपूर्वीच २६०० रुपये जाहीर करून टाकला आणि उचल देण्याची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांची चांगलीच कोंडी झाली.

धनंजय महाडीक यांच्यासोबत प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे .विक्षश्वराज महाडीक, मानाजी माने, रमेश बारसकर, भाजपाचे नेते माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, भैया देशमुख, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, विद्यमान उपाध्यक्ष सतीश जगताप, तालुका प्रमुख प्रशांत भोसले, सरचिटणीस महेश सोवनी आणि रमेश माने, भाजपचे प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा संयोजक अविनाश पांढरे, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, काँग्रेसचे शाहीर हावळे, भिमराव वसेकर, सुरेश शिवपुजे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.