सांगोला येथील अंबिका देवीची यात्रा उत्साहात सुरू
-----------------------------------------------------------------------------------
यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
-----------------------------------------------------------------------------------
सांगोला,( दै.पंढरी नगरी न्यूज) : सांगोला येथील प्रसिद्ध अंबिकादेवी यात्रेला यावर्षी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरातील नवीन जागेवर प्रथमच भरवण्यात आलेल्या यात्रेस कोरोनानंतर मोठी गर्दी दिसून येत आहे. भाविक व नागरिकांची यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी असली तरी कर्णकर्कश आवाजात वाजणाऱ्या भोंग्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पोलिसांनी अशा भोंगे वाजवणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त केल्यामुळे अंबिका देवीची यात्रा सुरळीत सुरू आहे.
करोनानंतर प्रथमच भरलेल्या अंबिका देवी यात्रेला यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. यात्रेमध्ये विविध प्रकारचे दुकाने, पाळणे, खेळण्याचे विविध प्रकारे खाद्य विक्रीचे स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या यात्रेमध्ये तमाशाचा फडही मोठ्या उत्साहात रंगला जातो. या यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन कोर्ट रिसीव्हरच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. यात्रा उत्साहात सुरू असली तरी यात्रेमध्ये कर्णकर्कश आवाजात वाजणाऱ्या भोंग्यांचा त्रास भाविकांना विशेषतः महिला व लहानांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यात्रेमधून मोठ्या आवाजात असे अनेक जण भोंगा वाजवीत फिरत असल्यामुळे याचा हेणारा त्रास व चर्चा सर्वत्र सुरू होती. पोलिसांनी लागलीच अशा भोंगा वाजवणाऱ्यांवर, टवळखोऱ्यांवर कारवाई करत यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला दिसून आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे यात्रा सुरळीत सुरू आहे. यात्रेला सांगोला तालुक्यामधून व तालुक्याच्या शेजारील मंगळवेढा, पंढरपूर भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत.
यात्रेमध्ये आम्ही प्लास्टिकच्या विविध साहित्याची दुकान लावले आहे. याला प्रथमच मोठी मागणी वाढली आहे. दुकानात खरीदारांची गर्दी यावर्षी भरपूर आहे - दर्शन घोंगडे, व्यापारी, सांगोला.