तत्कालीन ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्या समर्थनार्थ बुधवार दि.२७ रोजी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार
-------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) सोलापूरचे तत्कालीन जिल्हा ग्रंथालय अधिकारी दत्तात्रय क्षिरसागर यांच्यावरील अन्याय दूर करावा त्यांना संचालक या पूर्वपदावर नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने बुधवार दि. २७ रोजी सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय समोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी दिली.
माजी ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून काम करीत असताना त्यांनी शाळा घटक योजना ,एलजीएमएस प्रणाली द्वारे अनुदान वितरण, ग्रंथालय कायद्यात सुधारणा , ग्रंथालयाची नियोजित वेळेत तपासणी करणे, नवीन वाचनालयास मान्यता, दर्जा बदलासाठी निकष बदल अशी अनेक चांगली कामे मार्गी लावलेली आहेत.
माजी ग्रंथालय संचालक क्षीरसागर जिल्ह्यात अभ्यासू व आदर्श अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा म्हणून चांगली ओळख निर्माण झाली होती. जिल्ह्यातील ग्रंथालय प्रमुखांना किंवा पदाधिकारी यांना ते नावानिशी ओळखत असत त्यांच्या कामाची हातोटी वाखाण्याजोगी होती त्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून सोलापुर येथे ग्रंथालयातील अधिकारी कर्मचारी व ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन चार वर्ष अहोरात्र काम केले. त्यामुळे मुंबई येथे त्यांना ग्रंथालय संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली .ग्रंथालय संचालक पदावर काम करीत असताना राज्यातील ग्रंथालयांना चांगली दिशा देण्याचे काम केले आहे. दत्तात्रय क्षिरसागर यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना पूर्वपदावर नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी बुधवार दि. २७ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय प्रमुखांनी एक दिवस ग्रंथालय बंद ठेवून हे आंदोलन करण्यात येणार आहे. असे सुरवसे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सोलापूर ग्रंथालय संघाचे संचालक साहेबराव शिंदे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ,प्रकाश शिंदे ,वृषाली हजारे, दत्तात्रय मोरे, विनोद गायकवाड, सारिका मोरे, धोंडीबा बंडगर ,जयंत आराध्ये इ. उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सकाळी ९ वा .पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोरील नामदेव पायरीजवळ इडा पिडा टळो माजी ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्यावरील संकट टळो असे पंढरीच्या विठुरायाला साकडे घालण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी संचालक- ज्योतीराम गायकवाड(सर), सिद्धेवाडी (ता.पंढरपूर) येथील ज्ञानदीप वाचनालयाचे संस्थापक सचिव तानाजी जाधव, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक अन्सार शेख ,पंढरपूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रवीण पाठक तालुक्यातील सर्व ग्रंथालयाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे सांगितले.