बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये "वृक्षोत्सव पंधरवडा" उत्साहात संपन्न..
---------------------------------------------------------------------------------
बार्शी ( दै .पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे दिनांक १० जून २०२४ ते २४ जून २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या दि. ०७ जुन २०२४ च्या परिपत्रकानुसार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या पत्रानुसार जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय वृक्षांची लागवड करून वृक्षोत्सव पंधरवडा साजरा करण्यात आला. दि. २४ जुन २०२४ रोजी या पंधरवड्याचा समारोप समारंभ महाविद्यालयाच्या कर्मवीर क्रीडा संकुलामध्ये सायंकाळी आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री नंदनजी जगदाळे साहेब तसेच बार्शी तालुका कृषी अधिकारी श्री एस. एस. कोयले साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे हे होते. यावेळी व्यासपीठावर डॉ व्ही पी शिखरे, डॉ एस एम लांडगे, डॉ ए जी कांबळे, प्राचार्य डॉ शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून ५० वृक्ष लागवड करण्याची संकल्प पुर्ती करण्यात आली. वृक्षोत्सव पंधरवडा उपक्रमाचे समन्वयक सहा. प्रा. पी.पी. नरळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये या पंधरवड्यामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. सदर पंधरवड्यामध्ये महाविद्यालयाच्या आवारातील तसेच कर्मवीर क्रीडा संकुल परिसरात लागवड करण्यासाठी भारतीय वृक्षांची निवड, नियोजित ठिकाणी खड्डे काढणे, वृक्ष लागवड, वाकलेल्या वृक्षांना आधारफळी लावणे, वृक्षांच्या बुडात भर लावणे, आळी तणमुक्त करणे, अवास्तव वाढलेल्या झाडांची छाटणी करणे, तसेच झाडांच्या आजूबाजूच्या परिसरातील वाढलेले तण तणनाशक फवारून तणमुक्त करणे इत्यादी उपक्रम महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, बी.एड., बी.पी.एड., एम. एड. व एम. पी. एड. विभागातील प्रशिक्षणार्थी तसेच कर्मवीर योग मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी, वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.
प्रमुख पाहुणे मा. श्री. एस.एस. कोयले साहेब यांनी आपल्या मनोगतात भविष्यातील वृक्षांच्या वाढीसाठी तसेच कर्मवीर क्रीडा संकुल परीसर सुशोभीत करण्यासाठी परिपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष मा. नंदनजी जगदाळे यांनी कर्मवीर क्रीडा संकुलात पंधरवड्यामध्ये राबविलेल्या सर्व उपक्रमाबाबत कौतुक केले तसेच भविष्यातही असे उत्तम उपक्रम राबवून क्रीडा संकुल निसर्गरम्य तसेच आरोग्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत प्रोत्साहित केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच वृक्ष संवर्धन हे काही काळापुरते मर्यादित न राहता हे कार्य अविरत चालू ठेवावे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाईल तसेच पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होईल असा संदेश दिला.
प्रा. डॉ आर. ए. फुरडे यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. एस. जी. कांबळे यांनी कर्मवीर क्रीडा संकुल निर्माण होण्यापूर्वी तिथल्या परिसराची स्थिती व सद्यस्थिती याचा परिपूर्ण आढावा मांडला. समारोप समारंभाचे आभार डॉ. एम. व्ही. मते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. ए. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व विभागाचे प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले.