तुंगत परिसरात बिबट्या सदृश प्राण्याची दहशत, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
-----------------------------------------------------------------------------------
तुंगत (दै.पंढरी नगरी न्यूज): पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील पवार वस्ती याठिकाणी बिबट्यासदृश प्राण्याने जनावरांवर हल्ला केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे . दरम्यान मागील काही दिवसापूर्वी सुस्ते, चळे परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या आत्ता पुन्हा या बिबट्या सदृश प्राण्याने आपला मोर्चा तुंगत, रोपळे भागात वळविल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुंगत- रोपळे हद्दीत या प्राण्याने एका खिलार गाईवर ताव मारला होता, या ठिकाणी बिबट्या असल्याचे ठसेही आढळून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी याच तुंगत परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती व तो बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश आले नव्हते. यानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा बिबट्याने कमबॅक केले की काय अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे. तुंगत हद्दीतील पवार वस्ती परिसरामध्ये याचा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष इंद्रजीत रणदिवे, उपसरपंच प्रकाश रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रणदिवे, अंगद रणदिवे यांनी परिसरात पाहणी केली असता, येथील शेतात चिखलामध्ये प्राण्याचे ठसे आढळले आहेत. याची खात्री करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वन विभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी असणारा प्राणी बिबट्या असल्याचे आढळलेल्या ठशांवरुन स्पष्ट केले आहे.
दरम्यान या परिसरात बिबट्या असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गळीतास जाणारे ऊस शेतात उभे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आडोसा तयार झाला असून या उसाला पाणी देणे किंवा इतर कामासाठी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुंगत ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश (तात्या) पाटील यांनी संबंधित वनविभागाचे पंढरपूर विभाग वनपाल बी. एस. भोई, वनसेवक विठ्ठल पिसे या अधिकार्यांशी संपर्क साधून या भागात कॅमेरा बसवुन पिंजरा लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. यासंदर्भात लवकरच तुंगत गाव आणि वाडी वस्तीवरील नागरिकांसाठी बिबट्या सदृश प्राण्यासंदर्भात असणारे समज गैरसमज याबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे भोई यांनी सांगितले.