पुणे :राज्यतील १२०८ सहकारीसंस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर..
---------------------------------------------------------------------------------
पुणे( दै. पंढरी नगरी न्युज) : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यांवर दिनांक २० डिसेंबर २०२२पर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश दिला आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही सुरू असल्याने तणाव टाळण्यासाठी प्रामुख्याने 'अ' वर्गातील ३८आणि 'ब' वर्गातील ११७०मिळून एकूण १२०८सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. शासनाचे विशेष कार्य अधिकारी आणि सहकारी संस्थांचे सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. २९) जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील७ हजार ७५१ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्या ग्रामपंचायतीचा निकाल २० डिसेंबर २०२२रोजी असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक २३डिसेंबर आहे. तर, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार सद्य:स्थितीत 'अ' वर्गातील ३८ 'ब' वर्गातील ११७०, 'क' वर्गातील ३१५१ आणि 'ड' वर्गातील २७८८मिळून ७ हजार १४७सहकारी संस्थांच्या निवडणुकाही सुरू आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरू असल्याने गावागावांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या मोठी असून, 'अ' वर्गातील सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदविता यावा, यासाठी शासनाने 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका २०डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरी, सेवक सहकारी पतसंस्था, कर्मचारी बँका, नागरी बँकांच्या निवडणुका प्रामुख्याने पुढे ढकलल्या गेल्याचे सांगण्यात आले.