श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शन पूर्णतः मोफत, मंदिर समितीचे व्यवस्थापक - प्रविणकुमार घम ◼️ पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे मंदिर समितीचे आवाहन, ◼️ वायरल ऑडिओ क्लिप च्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर,( दै.पंढरी नगरी न्यूज): श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन हे मंदिर समितीमार्फत पूर्णतः निशुल्क मोफत स्वरूपात दिले जाते. दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची फी, देणगी अथवा रक्कम आकारली जात नसल्याची माहिती श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली आहे.
अलीकडे समाज माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, त्यामध्ये अज्ञात व्यक्तींमार्फत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनासाठी पास उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित व्यक्तीकडून मोबाईल क्रमांकाद्वारे डिजिटल पद्धतीने रक्कम स्वीकारण्यात आल्याची बाबही समोर येत आहे.
सदर प्रकार हा भाविकांची आर्थिक फसवणूक करणारा असून मंदिर समितीची बदनामी करण्याचाही प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते की,
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे दर्शन संपूर्णतः निशुल्क असून दर्शनासाठी कोणत्याही व्यक्तीस पैसे देऊ नयेत. कोणीही व्यक्ती दर्शनासाठी पैसे, पास किंवा विशेष सुविधा देण्याच्या नावाखाली मागणी करत असल्यास तत्काळ मंदिर समिती कार्यालयकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी केले.