पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न. ◾७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान ८५ टन कचरा संकलित; आजच्या श्रमदानातून २६ टन कचरा जमा. ◾स्वच्छता अभियानात 1000 जणांचा सहभाग.
--------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेले विशेष स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न झाले. दि. ७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ८५ टन कचरा संकलित करण्यात आला यामध्ये नागरिकांनी नदीपात्रात अर्पण केलेले वस्त्रे, धार्मिक साहित्य, निर्माल्य व इतर कचरा संकलित करण्यात आला असून आहे.आजच्या स्वच्छता मोहिमेत तब्बल २६ टन कचरा संकलित करण्यात आला. अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषदेसह विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, देशमुख जिम कट्टा ग्रुप, गुजराथी रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अनुलोम सामाजिक संस्था, आपटे उपलप प्रशाला, श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था अशा एकूण एक हजार जणांनी सहभाग घेतला होता.
या अभियानात ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत, ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. ठाकूरबुवा महाराज, ह.भ.प. उखळीकर महाराज, ह.भ.प. भागवत महाराज कबीर, ह.भ.प. ज्ञानेश्वर जोगदंड महाराज आणि ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी श्रमदान केले.
नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत योगदान दिले. समाजमाध्यमांवरून या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर कल्याण येथील स्वच्छतादूत केतन वाकडे यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत श्रमदान केले.
चंद्रभागा वाळवंट परिसरातील कचरा, प्लास्टिक आणि इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून सार्वजनिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असल्याचे ह. भ .प. रामभाऊ महाराज राऊत यांनी सांगितले.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसराला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने हा परिसर स्वच्छ व निर्मळ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची आणि भाविकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’, ‘श्रमदानातून भक्ती’ आणि ‘सहभागातून स्वच्छता’ या संदेशांतून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असल्याचे ह भ प जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.दर बुधवारी श्रमदान अभियान
पंढरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्यासाठीनगरपरिषदेच्या वतीने दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान आयोजित करण्यात येते. आजचे श्रमदान हे या अभियानातील चौथे श्रमदान होते.
या अभियानात सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक संस्थांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असेही आवाहनही मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.