पंढरपुरात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी :- आमदार समाधान आवताडे यांची माहिती, आरटीओ उपप्रादेशिक कार्यालय व महसूल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठीही पाठपुरावा सुरू.

पंढरपुरात अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मंजुरी :- आमदार समाधान आवताडे यांची माहिती, आरटीओ उपप्रादेशिक कार्यालय व महसूल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठीही पाठपुरावा सुरू.

-----------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज:-

पंढरपूर येथे नवीन अपर पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आवताडे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर हे देशभरातील लाखो वारकऱ्यांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येत असतात. यात्राकाळात वाढणारी गर्दी, वाहतूक व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूर येथे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाची आवश्यकता होती. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने हे महत्त्वपूर्ण कार्यालय मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रात पुढे मुख्यमंत्री म्हणतात की, या कार्यालयासाठी आमदार समाधान आवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दाखविलेली तळमळ आणि प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या निर्णयामुळे पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला, माळशिरस आणि परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, जलद आणि परिणामकारक पोलीस सेवा उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय तसेच महसूल विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यालयांबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पंढरपूर - मंगळवेढा तसेच परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना, वाहन हस्तांतरण, महसूलविषयक विविध प्रशासकीय कामांसाठी सोलापूर येथे जावे लागते. प्रस्तावित कार्यालयांना मंजुरी मिळाल्यानंतर ही सर्व कामे पंढरपूरमध्येच होणार असल्याने नागरिकांचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मंजुरीनंतर आता आरटीओ आणि महसूल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांनाही लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून पंढरपूरला विभागीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रशासकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.