सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय प्रमुखपदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती ◼️ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात स्वागत व निरोप समारंभ उत्साहात संपन्न, ◼️ प्रमोद पाटील यांच्या निवडीने सोलापूर जिल्ह्यात ग्रंथालय चळवळीत जल्लोष
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज): सोलापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी म्हणून प्रमोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रशासकीय बदली छत्रपती संभाजीनगर येथे, तर लिपिक प्रदीप गाडे यांची पुणे येथे झाल्याने त्यांच्या गौरवार्थ जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सेवक यांच्या उपस्थितीत स्वागत व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून प्रमोद पाटील यांनी तर हिरालाल पाटील यांनी लिपिक पदाचा कार्यभार स्वीकारला असून, या निमित्ताने मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नव्या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना शुभेच्छापर निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय चळवळीचे नेते तथा ग्रंथमित्र कुंडलिक मोरे होते. व्यासपीठावर निरीक्षक संजय ढेरे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाहक साहेबराव शिंदे यांच्यासह ग्रंथालय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुनील हुसे आणि प्रदीप गाडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात शासनमान्य ग्रंथालयांशी समन्वय, विविध प्रशासकीय कामकाजाची परिणामकारक अंमलबजावणी आणि ग्रंथालय सेवेच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या पुढील सेवाप्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच नवनियुक्त प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद पाटील आणि हिरालाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रंथालय विकास, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि शासनमान्य ग्रंथालयांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल, कर्मचारी, सेवक तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी केले.