अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई ; 20 ब्रास वाळू जप्त , तीन लाकडी होड्या नष्ट
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे सांगोला पाणी पुरवठा योजना, इसबावी येथे अवैध वाळू साठ्यावर धडक कारवाई केली असून, त्यामध्ये 20 ब्रास वाळू जप्त करण्यात आली . तसेच तीन लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी ही कारवाई केली आहे. भीमा नदी पात्रातील सांगोला पाणी पुरवठा योजना, इसबावी येथे अवैध वाळू साठा असल्याची तसेच भीमा नदी पात्रावरील रेल्वे पुलाखाली 50 पोती अवैध वाळू साठा केल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली.
शुक्रवार दि. 16 जून 2023 रोजीच्या रात्री 01.30 वाजता सदर ठिकाणी अवैध वाळू साठा केल्याचे निर्देशनास आले असता भरारी पथकाव्दारे धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये 20 ब्रास वाळू जप्त करुन शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे ठेवण्यात आली आहे. तसेच भीमा नदी पात्रावरील रेल्वे पुलाखाली 50 पोती अवैध वाळू साठा केलेली वाळू नदी पात्रात टाकण्यात आली व तीन लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने पुर्णपणे नष्ट करण्यात आल्या असल्याचे नायब तहसिलदार श्रोत्री यांनी सांगितले. या भरारी पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, तलाठी राजेंद्र वाघमारे, प्रशांत शिंदे, श्री.तपसे, महसुल सहाय्यक सचिन शेंडगे, सुभाष परळकर, सुरेश कदम , कोतवाल शिवा सलगर, लिंगा मदने, मसा वाघमारे, बाळू कांबळे, काकासाहेब कांबळे सहभागी होते.