मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. ◾मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान कार्यशाळा.
---------------------------------------------------------------------------
महाबळेश्वर,( दै.पंढरी नगरी न्यूज ) :-
ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीचे महामंथन !
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने महाबळेश्वर येथे आयोजित दोन दिवसीय उच्चस्तरीय कार्यशाळेचा आज शुभारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.
या कार्यशाळेला ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुंडकूलवार, यशदा चे उप महासंचालक डाॅ. मल्लीनाथ कलशेट्टी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या सिईओ याशनी नागराजन, प्रकल्प संचालक राजाराम दिघे, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत.
यावेळी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियानाच्या जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. अभियानाची उद्दिष्टपूर्ती, अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या प्रशासकीय अडचणी व त्यावरील उपाययोजना, सन २०२६-२७ चे नियोजन तसेच निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
ग्रामपंचायती अधिक सक्षम करणे, विविध शासकीय योजनांमध्ये प्रभावी समन्वय साधणे, योजनांचा लाभ तळागाळातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक गरजांनुसार विकासकामांना गती देणे, या दिशेने प्रशासनाने अधिक परिणामकारकपणे कार्य करण्याबाबत असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले.
सक्षम ग्रामपंचायत, प्रभावी प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर समृद्ध व विकसित ग्रामीण महाराष्ट्र घडविणे, हेच 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज' अभियानाचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी ही कार्यशाळा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ हे देखील उपस्थित आहेत.