शिक्षकाचे खरे वैभव त्यांच्या विचारात व लेखनात असते--, प्राचार्य बीपी रोंगे ◼️ प्राचार्य डॉ. एस एस गोरे लिखित "प्रवास :जन्मभूमीकडून कर्मभूमीकडे" ग्रंथ प्रकाशन व सेवापूर्ती सोहळा
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) शिक्षकांचे खरे वैभव त्यांच्या विचारात आणि लेखनात असते हा ग्रंथ विद्यार्थी संशोधक शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासात यांच्यासाठी निश्चित मार्गदर्शक ठरेल असे मत पंढरपूर येथील स्वेरीचे कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी पी रोंगे यांनी व्यक्त केले . येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे माजी प्राचार्य डॉ. एस एस गोरे लिखित "प्रवास :जन्मभूमीकडून कर्मभूमीकडे" ग्रंथाचे प्रकाशन व सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. बी पी रोंगे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव होते. यावेळी व्यासपीठावर जनरल सेक्रेटरी पी टी पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, माजी प्राचार्य डॉ .चंद्रकांत मोरे, विश्वस्त विष्णु पाटील, श्री रामलिंग बोडके, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही पी शिखरे, सत्कार मूर्ती माजी प्राचार्य डॉ. एस एस गोरे, श्रीमती शैलजा गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ .मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माजी प्राचार्य डॉ .एस एस गोरे लिखित "प्रवास :जन्मभूमीकडून कर्मभूमीकडे" ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. एस एस गोरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित लघुपट सादर करण्यात आला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ .चंद्रकांत मोरे, जनरल सेक्रेटरी पी टी पाटील, डॉ. प्रशम कोल्हे, खजिनदार जयकुमार शितोळे, रामभाऊ बोडके,श्रद्धा गोरे, सई गोरे आदी मान्यवरांनी डॉ एस एस गोरे यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य गोरे यांच्या शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय कार्याचा गुणगौरव केला. तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वातून इतरांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ .बी पी रोंगे म्हणाले की, प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि समाजाभिमुख कार्य या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी महाविद्यालयाचे नेतृत्व करताना केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाला चालना, शिक्षकांचा व्यावसायिक विकास आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांमुळे संस्थेला नवी दिशा मिळाली. डॉ. गोरे यांची कार्यशैली, शिस्तप्रियता, दूरदृष्टी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती ही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आज प्रकाशित होत असलेला ग्रंथ हा त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि ज्ञाननिष्ठेचा उत्कृष्ट पुरावा आहे. हा ग्रंथ विद्यार्थी, संशोधक, शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक यांच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.
प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांनी सत्कार उत्तर दिले. 32 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक शैक्षणिक संस्था, संस्थाचालक, शासन, विद्यापीठ यांच्याशी संबंध आला. समृद्ध अनुभव मिळाले. जीवनात जीवाभावाचे, रक्ताच्या नात्यापेक्षाही उत्कृष्ट नाती जपणारे मित्र मिळाले. हे माझे भाग्य आहे.त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला समृद्धता प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.
वडिलांच्या अकाली निधनानंतर आई , आजी, भाऊ, इतर नातेवाईकांचे सहकार्य मिळाले त्यामुळे माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे सरांसारखे देवत्वाच्या पलीकडचे गुरु मिळाले त्यामुळे मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा मार्ग सापडला. माझे जीवन यशस्वी होण्यात सर्व स्तरावरील गुरूंचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करून त्यांचे ऋण व्यक्त केले. पत्नी शैलजा , मुली श्रद्धा व सई यांच्या सोबतीने जीवन अधिक सुखकर होण्यास मदत झाली आहे. जीवनातील सुखदुःखात त्यांची खंबीर साथ मला मिळाली आहे ,हे माझे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली. संस्थाचालक ,संस्था पदाधिकारी,सहकारी प्राध्यापक या सर्वांचे ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. बी वाय यादव म्हणाले, प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात संस्थेच्या प्रगतीसाठी अतिशय समर्पित भावनेने कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन संस्कृती आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची शैक्षणिक ओळख अधिक दृढ झाली असून अनेक उपक्रमांना नवी दिशा मिळाली आहे.
डॉ. गोरे यांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संशोधनाची आवड, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्ये रुजविण्याचे कार्य केले आहे. सेवापूर्तीच्या निमित्ताने ग्रंथरूपात ज्ञानरूपी देणगी समाजाला अर्पण करणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. डॉ. गोरे यांनी यापुढेही लेखन, संशोधन, मार्गदर्शन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून शिक्षणविश्वाला दिशा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास पंढरपूर येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, सुशीलकुमार पाटील, राजाराम इंगवले, प्रा.लक्ष्मीकांत पवार इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ .व्ही पी शिखरे यांनी केले. प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा परिचय डॉ .एम व्ही मते यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार डॉ. एम एस डिसले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक ,कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.