श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात समितीच्या वतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन. ◾नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाने रंगणार सहा दिवसीय संगीत महोत्सव.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात समितीच्या वतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन.  ◾नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाने रंगणार सहा दिवसीय संगीत महोत्सव.

---------------------------------------------------------------------------
पंढरपूर,( दै.पंढरी नगरी न्यूज): -श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने श्री गणेशाच्या आगमनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सहा दिवसीय गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संगीत महोत्सव श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे सायंकाळी ७.३० वाजता होणार असून, नामवंत गायक-गायिकांच्या सुरेल गायनाची मेजवानी पंढरपूरकर कलारसिकांना मिळणार आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव व व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संगीत महोत्सवामध्ये मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी भजनसम्राट शंकरराव वैरागकर (नाशिक) यांचा ‘स्वरविठ्ठल’, बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक जयतीर्थ मेऊंडी (हुबळी) यांचा ‘अभंगरंग’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.

तसेच रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी स्वाती रांजेकर यांचा ‘करावा विठ्ठल’, सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पंढरपूरचे स्थानिक कलाकार गणेश गोडबोले यांचा ‘स्वरपंढरी’, मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी श्रुती पाटील (मुंबई) यांचा ‘विठ्ठल वारी’ आणि बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी उन्मेष शहाणे (सोलापूर) प्रस्तुत ‘कल्चर शिदोरी’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी गायनसेवा अर्पण करण्यासाठी येणाऱ्या या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंढरपूरच्या सांस्कृतिक वातावरणात भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा सुरेल संगम अनुभवता येणार आहे.

या गणेशोत्सव संगीत महोत्सवाचा पंढरपूरकर तसेच परिसरातील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.