अखेर सोलापूरचे जिल्हा अधिकारी एस. कार्तिकेयन यांचा आदेश विठ्ठल मंदिरे समितीने टाकला केराच्या टोपलीत ◼️ पंढरीच्या विठुरायाचे व्हीआयपी दर्शन सुरूच भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

अखेर सोलापूरचे जिल्हा अधिकारी एस. कार्तिकेयन यांचा आदेश विठ्ठल मंदिरे समितीने टाकला केराच्या टोपलीत  ◼️ पंढरीच्या विठुरायाचे व्हीआयपी दर्शन सुरूच भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज)आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरातील विठुरायांच्या दर्शनासाठी आता हळूहळू माऊंलीच्या नगरीत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे पंढरपुरात आता वारकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाबाबत 15 जुलै रोजी महत्त्वाचे निर्णय घेताना मंत्री, आमदार आणि खासदारांच्या व्हीआयपी दर्शनावर बंदी घातली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र सरकारने दिलेले आदेश आज मंत्र्यांनीच धुडकावून लावल्याचे पाहायला मिळाले.

आषाढी वारीच्या निमित्ताने भाजपा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार कुटुंबीयांसह पंढरपुरात दर्शनासाठी आले होते. मात्र मंदिर प्रशासनाने केवळ मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला मंदिरात प्रवेश दिला. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या इतर नातेवाईकांना व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश नाकारण्यात आला. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह थेट दर्शनासाठी गेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही नेत्यांच्या व्हिआयपी दर्शनावरून टीका केली. वातावरण तापत असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी यापुढे पंढरपूरमध्ये अतिशय कठोरपणे व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले की, आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेपर्यंत सरकारी प्रोटोकॉलचे पालन करताना मंत्री, आमदार आणि खासदार यांना व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. पण त्यांच्यासोबत दोन किंवा तीन लोकांनाच दर्शनासाठी सोडले जाणार आहे. तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्कालीन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे. तसेच पहिल्या दिवशी काही प्रमाणात गोंधळ झाल्याची कबुली देत, यापुढे कोणालाही नियमांमध्ये सवलत दिली जाणार नसल्याचे एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे.