मंगळवेढा-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर चोरट्यांनी एका कुटूंबियास चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने 1 लाख 4 हजार किंमतीचा मुद्देमाल नेला पळवून. ◼️ अज्ञात चौघा चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल......

मंगळवेढा-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर चोरट्यांनी एका कुटूंबियास चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने 1 लाख 4 हजार किंमतीचा मुद्देमाल नेला पळवून.  ◼️ अज्ञात चौघा चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल......


---------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज):-
मंगळवेढा ते सांगोला रोडवरील कचरेवाडी बोगद्याजवळ रात्रीच्यावेळी कारगाडी बंद पडल्याने त्याचा गैरफायदा घेत पाठीमागून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी गाडीत बसलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 4 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल घेवून पोबारा केल्याची घटना घडली असून अज्ञात चार चोरट्याविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी अक्षय जावीर (रा.मरवडे) हे दि.11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता कार क्रमांक एम.एच.13 ए.सी.1356 या गाडीने त्याची आई व फिर्यादी सांगोल्याहून मंगळवेढ्याकडे येत असताना कचरेवाडी बोगद्याजवळ सदर कार गाडी बंद पडल्याने एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओमध्ये अज्ञात चौघे आले व त्यांनी फिर्यादी व त्याचे आई वडिल यास चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून जबरदस्तीने दागिने रोख रक्कम असा एकूण 1 लाख 4 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने काढून घेवून गेले. या झटापटीत फिर्यादी व फिर्यादीची आई यांना दुख:पत झाली. ही झटापट पाहून काही लोक सदर ठिकाणी जमा होताच त्यांना पाहून चोरट्यांनी स्कॉर्पीओ गाडीमधून सोलापूरच्या दिशेेने पलायन केले. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे हे करीत आहेत. दरम्यान रात्री 9 वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या जबरी चोरीमुळे मंगळवेढा तालुका हादरुन गेला आहे. या चोरट्यांना पोलीसांची भीती आहे की नाही? याबाबत नागरिकामधून प्रश्न विचारला जात आहे. पोलीसांना चोरटे पकडण्यात वारंवार अपयश येत असल्यामुळे चोरटे मुजोर बनू पाहत असल्याचा आरोप नागरिकामधून होत आहे. पोलीसांच्या खाकी वर्दीचा वचक मंगळवेढ्यात वारंवार घडणार्‍या चोर्‍यांमुळे कमी होत असल्याचे विदारक चित्र नागरिकांना पहावयास मिळत आहे. बुधवारी गटारी अमावस्या असल्याने चोरट्यांनी त्या काळरात्रीचा अनेक ठिकाणी फायदा घेत ग्रामीण भागात घरफोड्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत.