आषाढी एकादशी दिवशी एक लाख देशी वृक्षबियांचे मोफत वाटप; :- मंदिर समितीचे सदस्य, शिवाजीराव (महाराज )मोरे ◼️ प्रत्येक वारकऱ्याने आपल्या गावात किमान एक देशी वृक्ष लावण्याचा संकल्प करावा : कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी एकादशी दिवशी एक लाख देशी वृक्षबियांचे मोफत वाटप; :- मंदिर समितीचे सदस्य, शिवाजीराव (महाराज )मोरे  ◼️  प्रत्येक वारकऱ्याने आपल्या गावात किमान एक देशी वृक्ष लावण्याचा संकल्प करावा : कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) – आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यावर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शदर्शनरांगेत येणाऱ्या वारकरी भाविकांना एक लाख देशी वृक्षबियांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित महाराष्ट्राचा संदेश प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचावा, तसेच प्रत्येक भाविकाने आपल्या गावात परतल्यानंतर किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

आषाढी वारी ही केवळ भक्ती, श्रद्धा आणि संतपरंपरेचा उत्सव नसून समाजप्रबोधनाचीही एक प्रभावी चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह संतपरंपरेने निसर्गप्रेम, सर्व जीवांप्रती करुणा आणि पर्यावरणाशी सुसंवादाचा संदेश दिला आहे. त्याच संतविचारांचा वारसा जपत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने "निर्मल वारी, हरित वारी" या अभियानांतर्गत वृक्षबियांचे वितरण करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

या उपक्रमामुळे लाखो वारकरी भाविकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होण्यास मदत होणार असून, प्रत्येक वारकरी आपल्या गावात वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करेल, असा विश्वास मंदिर समितीने व्यक्त केला आहे. वारीच्या माध्यमातून राज्यभर आणि देशभर हरित संदेश पोहोचविण्याचे हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. मंदिर समितीने सन २०२५ पासून मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला असून, दरवर्षी अधिकाधिक भाविकांपर्यंत हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संरक्षण यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला वारकरी संप्रदायाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

याबाबत माहिती देताना मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांनी सांगितले की, भाविकांना वितरित करण्यात येणाऱ्या देशी वृक्षबियांमुळे वारीचा आध्यात्मिक संदेश आणि पर्यावरण संरक्षणाचा सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधला जाणार आहे. "एक वारकरी – एक वृक्ष" हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असून, प्रत्येक भाविकाने आपल्या गावात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केल्यास हरित महाराष्ट्र घडविण्यास मोठी मदत होईल. आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांच्या माध्यमातून हा हरित संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, भक्ती, सेवा, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या चारही मूल्यांचा संगम घडविणारी "निर्मल वारी, हरित वारी" ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात समाजापुढे येणार असल्याचा विश्वास मंदिर समितीने व्यक्त केला आहे.