आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिंड्यांना "श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार" देणार ◼️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण , :- महाराष्ट्राचे प्रसिद्ध वृक्षमित्र तथा मंदिर समितीचे सदस्य, ह .भ .प शिवाजीराव (महाराज) मोरे
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै पंढरी नगरी न्यूज ) – पंढरीची पायीवारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक असून, शेकडो वर्षांपासून संतांच्या विचारांचा आणि वारकरी संप्रदायाच्या समतेच्या संदेशाचा अखंड वारसा जपणारी परंपरा आहे. "ज्ञानोबा-तुकाराम" यांच्या नामघोषात लाखो वारकरी शिस्त, सेवा, त्याग, समता आणि भक्तीचा आदर्श समाजासमोर ठेवत पंढरीची वाट चालतात. या दिव्य परंपरेचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक वारकरी, प्रत्येक नागरिक आणि समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे.

वारकरी संप्रदाय केवळ अध्यात्माचा संदेश देत नाही, तर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समता, स्त्री सन्मान, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली यांसारख्या सामाजिक मूल्यांचेही प्रभावी प्रबोधन करतो. वारी ही चालती-बोलती संस्कारशाळा असल्याने या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची मोठी संधी उपलब्ध होते.
या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने "निर्मल वारी, हरित वारी अभियान" प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी, वृक्षसंवर्धन, पाणी बचत, कचरा व्यवस्थापन, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, सामाजिक समता आणि लोकजागृती या विषयांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिंड्यांचा गौरव व्हावा, तसेच इतर दिंड्यांनाही प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने सन २०१८ पासून मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली "श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार" सुरू केला आहे.
या पुरस्कारामुळे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांमध्ये स्वच्छता, शिस्त, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली असून, अनेक दिंड्यांनी स्वतःहून स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्त वारी, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरण, पाण्याची बचत, आरोग्य जनजागृती, रक्तदान, व्यसनमुक्ती आणि सामाजिक संदेश देणारे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे वारीचा अध्यात्मिक सोहळा अधिक सुसंस्कृत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनत आहे.
सन २०२६ च्या आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांपैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पहिल्या तीन दिंड्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिकाचा धनादेश प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे –
- प्रथम क्रमांक – ₹१,००,०००/-
- द्वितीय क्रमांक – ₹७५,०००/-
- तृतीय क्रमांक – ₹५०,०००/-
या पुरस्कारासाठी दिंड्यांचे स्वच्छता व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त उपक्रम, पर्यावरण संवर्धन, शिस्तबद्ध संचलन, सामाजिक संदेश, वृक्षसंवर्धन, आरोग्य जनजागृती, कचरा व्यवस्थापन, वारकऱ्यांचा सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जनजागृती यांसारख्या विविध निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे, या पुरस्कारासाठी परीक्षण व निवड प्रक्रिया पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने पार पाडण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ आणि वृक्षमित्र ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांची त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती विविध दिंड्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आणि निर्धारित निकषांच्या आधारे अंतिम निवड करणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांनी सांगितले की, "पंढरीची वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर समाज परिवर्तनाचीही चळवळ आहे. संतांनी दिलेल्या समता, सेवा आणि स्वच्छतेच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. 'निर्मल वारी, हरित वारी' ही संकल्पना प्रत्येक दिंडीने स्वीकारल्यास भविष्यातील वारी अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक, निरामय आणि प्रेरणादायी ठरेल. 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार' हा केवळ सन्मान नसून समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या दिंड्यांच्या कार्याची दखल घेणारा गौरव आहे. या माध्यमातून अधिकाधिक दिंड्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सहभागी होतील, असा विश्वास आहे."